राज्यातील बाजार समित्यांच्या विविध विषयांसंदर्भात संवाद साधण्यासाठी सोमवार, 24 फेब्रुवारी रोजी पुणे येथे बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिली. या परिषदेत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे मार्फत आयोजित ही परिषद पुण्याच्या बाणेरमधील बंटारा भवन येथे होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. तर पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यासह कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे आदी या परिषदेस उपस्थित राहणार असल्याची माहिती मंत्री रावल यांनी दिली.